उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक | महाविकास आघाडी पॅनल समोर ‘शिवाजी हुडे’ यांचे थेट आव्हान

0
1317
उदगीर निवडणूक

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक |  उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये रोज एक नवे वळण येत आहे. कालपर्यंत काँग्रेसच्या बाजूने झुकलेली निवडणूक एकदम धक्कादायक वळण घेत रंगात आली आहे. दोन माजी सभापती मुन्ना पाटील व शिवाजी हुडे आमने सामने असल्याने ही निवडणूक अटीतटीची नाही तर प्रतिष्ठेची होणार आहे, याचा अंदाज साऱ्यांनाचं होता पण माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज उदगीर येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. त्यामुळे निवडूक निरस वाटू लागली होती.

त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकाला विरुद्ध जिल्हा उपनिबंधकाकडे शिवाजीराव हुडे यांनी वकिलामार्फत आव्हान दिले होते. या प्रकरणी सुनावणी होऊन त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीचा रंग आणि ढंग बदलणार आहे. मुन्ना पाटील व शिवाजी हुडे यांच्या जीवावर दोन्ही गटातील इच्छुकांची दारोमदार आहे. दोन्ही गटातील इच्छुकांना मुन्ना पाटील व शिवाजी हुडे यांच्या पैशावर निवडणूक लढायची आहे. कारण हे दोघेच स्वतःच्या खिशात हात घालून निवडणूक लढवू शकतात.

मुन्ना पाटील विरुद्ध शिवाजी हुडे अशी लढत झाली तरचं मतदारांना बरकत येणार आहे; नाही तर रोटी, बोटी व चपटी एवढ्यापुरती निवडणूक राहिली असती. आता शिवाजी हुडे यांचा अर्ज वैध ठरल्याने मतदारांचा जीव भांड्यात पडला आहे. काल पर्यंत शिवाजी हुडे यांचा अर्ज अवैध ठरला तर माघार घ्यायची मानसिक तयारी बऱ्याच जणांनी केली होती. आज शिवाजी हुडे यांचा अर्ज वैध ठरल्याने एकदम वारे बदलून गेले आहे.

या निवडणुकीत भाजपाला सत्तेची उब असल्याने अनेक ‘फायदे’ मिळणार आहे. तर महाविकास आघाडीच्या पॅनल सत्तेतून बाहेर असल्याने त्यांच्यावर अनेक मर्यादा येणार आहेत. दोन्ही गटात अनेक मोठे चेहेरे असले तरी त्यांच्या पुढेही अनेक मर्यादा आहेत. मागच्या 5 वर्षातील कारभाराची जमा-पावती देखील सोबतीला आहे. मागच्या सभापतींवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत, ते प्रकरण बरेच गाजले होते. त्याच प्रकरणाचा फटका मुन्ना पाटील यांना बसला होता.

काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटूरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले हे प्रचार करीत आहेत. शिवाजी हुडे यांचा अर्ज अवैध ठरणार आणि निवडणूक एकतर्फी होणार असा अनेकांचा कयास होता, पण आजच्या निकालाने मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दुसरीकडे भाजपा गोटात वरकरणी आलबेल दिसत असले तरी प्रभावहीन नेतृत्वाची उणीव भासणार आहे. शिवाजी हुडे यांच्या जीवावर निवडणूक लढावी व जिंकावी लागणार आहे. मतदारांवर प्रभाव पडेल व पाडेल असे नेतृत्व नाही. शिवाजी हुडे यांना निवडणुकीतील बारकावे आणि निवडून यायची टेक्निक माहित असल्याने निवडणूक सोपी आहे. याउलट जर भाजपाच्या नेत्यांनी एकदिलाने काम न करता हातचलाखी केली तर मात्र सोपी वाटणारी लढाई कठीण होणार आहे.

सध्याचे चित्र पाहिले तर दोन्ही गटात काही चेहेरे आवडते तर काही ना आवडते आहेत. त्याला अनेक कारण आहेत. त्यामुळे शिवाजी हुडे यांचे ‘नियोजन’ खूप महत्वाची भूमिका ठरणार आहे. देशात, राज्यात सत्ता असताना उदगीरात मात्र भाजपा चाचपडत आहे. या निवडणुकीवर आगामी निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. मला मदत करा मी तुम्हाला मदत करतो, हा डाव दोन्ही गटातील नेत्यात आणि कार्यकर्त्यात खोलवर रुजला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लढाईत काय होईल, हे चार दिवसात स्पष्ट होणार आहे.

काँग्रेस पक्षाच्यावतीने हुडे यांचा अर्ज वैध ठरला तरीही काही फरक पडत नाही, असे बोलले जात असले तरी कालपर्यंत स्वस्त असणारी निवडणूक एका रात्रीत काँग्रेससाठी अतिशय महागडी झाली आहे. मतदार दोन्ही खिशात हात घालून ऐटीत उभा आहे, कारण निवडणुकीत धनलाभ होईल, हे सांगायला कोणत्याही जोतिष्याची गरज उरली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते हुडे गटाला फेव्हर होईल अशी भूमिका घेत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुसवा काढायचा प्रयत्न करीत असले तरी अनेकांचा मोहभंग झाल्याने वचपा काढण्याची दाट शक्यता आहे.

शिवाजी हुडे यांच्या एंट्रीमुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक अटीतटीची झाली आहे. 20 तारखेला उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरीही, कालपर्यंत सायलेंट मोडवर असणारी भाजपा तासा भराच्याचं चार्जिंग नंतर फुल चार्ज झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनलला देखील त्याच ताकतीने पुढे येणे गरजेचे आहे, महाविकास आघाडीच्या पॅनल समोर सध्या तरी शिवाजी हुडे यांचे कडवे आव्हान उभे आहे. महाविकास आघाडीच्या पॅनल कशी झुंज देते यावर भवितव्य अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here