नाइट पार्टी, कॉकटेल अन् मृत्यू; दिशा सालियनच्या फ्लॅटमध्ये त्या रात्री काय घडलं?

0
15
दिशा सालियन
दिशाची हत्या झाली नसल्याचा दावा सीबीआयच्या टीमने केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिशा तिच्या सोसायटीमध्ये 14व्या मजल्यावर राहत होती. ज्या रात्री घटना घडली होती तेव्हा ती दारूच्या नशेत होती.

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 2020मध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्याने आत्महत्या करण्याच्या पाच दिवस अगोदर त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियान हिचाही संशयास्पद मृत्यू झाला होता.

तिच्या मृत्यूचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. दिशाच्या मृत्यूची केस पुन्हा एकदा उघडली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि सीबीआयच्या पथकानं केला होता. हीच टीम सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करत होती.

त्या वेळी सीबीआयने दिशाच्या प्रकरणात दिलेली थिअरीही संबंधितांनी मान्य केली होती. आता एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार आहे. एसआयटी कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर या प्रकरणाचा तपास करणार आहे, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

28 वर्षांची दिशा सालियान ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. आठ आणि नऊ जून 2020 च्या मध्यरात्री दोन वाजता इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाचच दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी, सुशांतसिंह राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. या दोन्ही प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

सीबीआयने काय सांगितलं होतं?

दिशाची हत्या झाली नसल्याचा दावा सीबीआयच्या टीमने केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिशा तिच्या सोसायटीमध्ये 14व्या मजल्यावर राहत होती. ज्या रात्री घटना घडली होती तेव्हा ती दारूच्या नशेत होती.

त्यामुळे ती तोल जाऊन फ्लॅटमधून खाली पडली. 8-9 जून 2020 च्या रात्री दिशाने तिच्या फ्लॅटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. तिचे अनेक मित्रही तिथे उपस्थित होते. दिशा तिचा बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत भरपूर दारू प्यायली होती. त्यानंतर सर्व जण जेवले.

पार्टी संपल्यानंतर ती घराच्या बाल्कनीत उभी होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने व जास्त रक्तस्राव झाल्याने दिशाचा मृत्यू झाला होता. सीबीआयने या तपासासाठी वेगळा गुन्हा नोंदवला नव्हता.

दोन दिवसांनंतर झालं होतं पोस्टमॉर्टेम

या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं. बोरिवली पोस्टमॉर्टेम सेंटरमध्ये ही प्रक्रिया पार पडली होती. पोस्टमॉर्टेमसाठी दोन दिवसांचा विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, डोक्याला लागलेला मार आणि इतर अनेक अनैसर्गिक जखमा दिशाच्या मृत्यूला कारणीभूत होत्या. 14व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे अनेक जखमा तिला झाल्या होत्या.

हल्ल्याचे पुरावे नाहीत

दिशा सालियनशी कोणताही गैरप्रकार झाला नव्हता. शारीरिक हल्ल्याचे कोणतेही पुरावे आढळले नव्हते. ती उंचावरून खाली पडली होती. त्यामुळे प्रायव्हेट पार्टला दुखापत होण्याचा प्रश्नच नव्हता, असं तपासात सांगण्यात आलं होतं.

त्या वेळी दिशाच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर अनेक अंदाज लावले जात होते. दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचा थेट संबंध जोडला जात होता.

एका व्यक्तीने स्वतःला प्रत्यक्षदर्शी सांगून दिला होता जबाब

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी अनेक सिद्धांत मांडले गेले होते. याचदरम्यान, प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला सांगितलं होतं, की तो अभिनेता आहे. घटना घडली त्या रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान तो दिशाच्या मालाडमधल्या फ्लॅटवर गेला होता.

तिथे तासभर पार्टी चालली होती. यानंतर काही जण वगळता दिशा आणि बाकीच्या व्यक्ती दोन बेडरूममध्ये गेल्या होत्या. त्यांनी आतून लॉक लावलं होतं.

एका बेडरूममध्ये दिशा आणि तिचा होणारा नवरा रोहन हे दोघं होते. या व्यक्तीने वृत्तवाहिनीवर असाही दावा केला होता, की त्या रात्री दिशावर बलात्कार झाला होता; मात्र तपास यंत्रणा, तपास अहवाल आणि दिशाच्या नातेवाईकांनी हा दावा फेटाळून लावला होता.

मुलीला बदनाम करण्याचा प्रयत्न

दिशाच्या मृत्यूनंतर जवळपास आठवडाभरात सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. यानंतर दोघांच्या मृत्यूचा संबंध जोडला जात होता. सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या येत होत्या.

यानंतर, आपल्या मुलीला बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. दिशानं कधीही कोणत्याही पार्टीला हजेरी लावली नाही किंवा तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचा दावा ते करत होते.

वडिलांनी केली होती पोलीस तक्रार

दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं, की मीडियातल्या काही व्यक्ती त्यांच्या मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत आहेत.

नेत्यांसोबत ती पार्टी करत असल्याच्या बातम्या एकदम खोट्या आहेत. तिच्याबद्दल बलात्कार, खून अशा शब्दांचा वापर केला जात आहे. यामुळे दिशा आणि कुटुंबाची बदनाम होत आहे.

पोलिसांवर व्यक्त केला होता विश्वास

दिशाच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त केला होता. मुंबई पोलिसांच्या कारवाईबाबत आपली कोणतीही तक्रार नाही. तसंच आपल्या मुलीच्या मृत्यूमागे कोणतंही षडयंत्र दिसत नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं होतं.

जे खोट्या बातम्या पसरवत आहेत आणि त्यांच्या मुलीचं व कुटुंबाचं नाव बदनाम करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, असं आवाहनही सतीश सालियन यांनी मुंबई पोलिसांना केलं होतं.

एसआयटीच्या तपासाला आधार काय?

दिशाचा मृत्यू अपघाती होता, असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. ती नशेच्या अवस्थेत तिच्या फ्लॅटमधून खाली पडली होती, हेही मान्य केलं होतं; पण एक गोष्ट समजू शकली नव्हती, की ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करत होती तर तिच्या मृत्यूच्या वेळी ते सर्व जण कुठे होते?

मित्र-मैत्रिणी घरी गेले असले तरी तिचा बॉयफ्रेंड तिथेच असण्याची शक्यता होती. सर्वांच्या उपस्थितीत दिशाचा मृत्यू झाला असेल, तर त्यांनी पुढे येऊन माहिती का नाही दिली, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

या प्रकरणात राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचंही नाव पुढं आलं होतं. कदाचित याच गोष्टींच्या आधारे आता महाराष्ट्र सरकार हे प्रकरण पुन्हा उघडणार आहे. एसआयटी या प्रकरणाची नव्याने चौकशी करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here