सध्या शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. राज्यात अतिवृष्टी आणि सत्तांतराचे नाट्य एकदाच रंगात आले होते. अतिवृष्टी झाली, गोगलगाईनी शेतकर्यांचे पीक उभ्याने नष्ट केले. शेतकरी बांधावर रडत असताना सत्ता वाचविण्यासाठी व सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी व विरोधक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.
शेतकर्यांना वाटले, सत्तांतर झाले, आमचे दुःख सरकार ऐकेल. मात्र सरकार मात्र दहिहंडी, गणपती उत्सवात मशगुल झाले. या सर्व दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले. शेतकर्यांना मदत करायची वेळ आली; तेव्हा भाजपाच्या आमदारांनी आपापल्या मतदार संघातील शेतकर्यांना मदत मिळवून दिली. यामागे आगामी निवडणूकांचे गणित व मतांची गोळाबेरीज करायचे पाप दडलेले होते.
लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावात, शेतात व शिवारात गोगलगाईचा प्रादूर्भाव झालेला असताना फक्त निलंगा व औसा मतदार संघातील शेतकर्यांना मदत मिळाली, बाकीच्या तालुक्यातील शेतकर्यांच्या तोंडाला कवडीमोल मदत करुन पानं पुसली. शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर जाणीवपूर्वक पाणी फिरविण्यात आले. उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले, पहिल्या दिवसांपासून या प्रश्नाकडे आमदार संजय बनसोडे अधिकारी व सरकार दोघांचे लक्ष वेधत होते.
मात्र अधिकारी व सरकारने उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून काहीही प्रयत्न केले नाही. तरीही आमदार संजय बनसोडे या नुकसानीचे पंचनामे व्हावेत, प्रश्नांची दाहकता लक्षात यावी म्हणून सरकार आणि अधिकारी यांच्यासमोर आपले गार्हाणे मांडत होते. कृषिमंत्री यांची भेट घेतली, अधिकार्यांची अनेकदा बैठक घेतली. मतदार संघातील नुकसानीची आकडेवारी दिली. शेतकर्यांच्या वेदनांची जाणीव करुन दिली.
त्यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकर्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाईचे अनुदान जाहीर झाले आहे. उदगीर तालुक्यासाठी 43 कोटी 97 लक्ष 56 हजार रुपये मंजुर झाले आहेत, यामध्ये शेतकरी संख्या 39,933 असून 32335 हेक्टर बाधित क्षेत्र आहे. जळकोटसाठी 17 कोटी 35 लक्ष रुपयांची नुकसान भरपाई मंजुर झाली आहे, तर जळकोट मधील शेतकरी संख्या 21,567 आहे. तर बाधित क्षेत्र 12758 हेक्टर आहे.
या जिल्ह्यात निलंगा व औसा सोडले तर बाकीच्या मतदारसंघातील शेतकर्यांना मदत न करण्यामागचे कारण जनतेला व शेतकर्यांना कळाले आहे. लातूर शहर व ग्रामीण, अहमदपुर आणि उदगीर-जळकोट तालुक्यातील शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. आता या मतदार संघातील तालुक्यांना मदत न मिळायला स्थानिक आमदार दोषी आहेत, की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे राजकारण जबाबदार आहे, हे जाहीर सांगावे.
राजकारण प्रत्येक पक्ष करीत असतो. मात्र शेतकर्यांच्या दुःखात, त्यांच्या संकटात राजकारण केले जात असेल तर जनतेचे दूर्दैव समजावे लागेल. उदगीर व जळकोट तालुक्यातील संजय बनसोडे विरोधकांना तर एकाएकी हुरुप आला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकाएकी आवाज वाढविला आहे. काही जणांनी आपले प्यादे पुढे केले आहेत. काहीजण पडद्याआडून काड्याकुड्या करीत आहेत. त्यांचा अजेंडा आता एकदम फिक्स आहे, काहीही व कसेही करुन संजय बनसोडे यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण तयार करायचे आहे.
शेतकरी कायम संकटात आहे. कधी गारपीट, अतिवृष्टी, गोगलगाईचा प्रादूर्भाव हे त्याच्या पाचवीला पूजलेले आहे. तरीही ओढून ताणून या संकटाला संजय बनसोडे यांच्याशी जोडण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. दररोज मतदार संघात राहून लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेवून, त्या सोडविण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. उदगीर-जळकोट मतदार संघातील अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या अवघ्या दिड दोन वर्षात पूर्ण करण्याचा विक्रम स्थापित केला आहे.
या आधीही आमदार होते, त्यांनी कितीदा शेतकर्यांच्या बांधावर जावून दुःख जाणून घेतले आहे. किती समस्या जाणून घेतल्या आणि किती समस्या सोडविल्या आहेत. निवडणूकांच्या आधी सहा महिने ‘छोटा रिचार्ज’ मारुन तिकीट मिळवायचे आणि निवडणूक संपली की ‘आऊट ऑफ कव्हरेज’ व्हायचे, हा आजवरचा शिरस्ता राहीला आहे. आमदार संजय बनसोडे यांची काम किमान सांगता तरी येतील अशी आहेत. मागच्या आमदारांना फक्त वेळकाढूपणा केला, विकासापासून मतदार संघाला वंचित ठेवले, हे कटू असले तरी सत्य आहे.
मतदार संघातील जनतेच्या सुख दुःखाशी स्वतःला जोडण्याचे काम संजय बनसोडे यांनी केले आहे. काहीजण सध्या रडारड करत आहेत. कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. कोणाला गुत्तेदारी हवी होती, कोणाला महामंडळ हवे होते, कोणाला तिकीट हवे होते, ज्याच्या त्याच्या भानगडी निस्तरायच्या होत्या म्हणून संजय ‘भाऊ’ लाडके होते. जेव्हा कळले की आता हाताला काही लागणार नाही, तेव्हा एकाएकी हात सोडून पळायला लागले.
काहीजण तर अक्षरशः संजय बनसोडे यांना ‘अल्लादिनचा दिवा’ म्हणून वापरत होते. जरा घासले की संजयभाऊ हजर व्हायचे आणि ‘हुकूम मेरे आका’ म्हणायचे, मग काय सगळ्यांन चेव चढला. कोणी लातूरात बसून बोलू लागले, कोणी हातात माईक आला की खोचक बोलू लागले. कोणी पाठीमागे तर कोणी पेपरवाल्यांपुढे बोलू लागले. सगळ्यांचा अजेंडा एकदम ‘टूलकीट’ वापरुन सुरु होता. संजयभाऊ कसा आणि किती वाईट आहे, हेच सांगू लागले. जे पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत सोबत रहायचे, तेच एकदम पलटी मारुन बोंबलायला लागले, ये तो अजूबा हो गया!
खरे तर आमदार संजय बनसोडे यांनी कोरोना असो की अतिवृष्टी असो, घरोघर, गावागावात भेट दिली आहे. मतदार संघात संकट कोणतेही असो, आमदार म्हणून संजय बनसोडे कायम हजर आहेत. काही असंतुष्ट लोक सोडले तर कोणालाही काहीही अडचण नाही. मग अडचण कुठे व कोणाची हे समजून घेतले तर एका मिनीटात चित्र स्पष्ट व ठळक दिसू लागते. ज्यांना खाऊन खाऊन अजीर्ण झाले तेच करपट ढेकरं देत, खाल्लेलं किती बेचवं होत हे सांगत आहेत. याउलट उरलेले बाकीचे त्याला खायला मिळाले पण माझा नंबर येईपर्यंत सगळे संपले या रागातून बोंबलत आहेत.
गोगलगाई काही संजय बनसोडे आमदार आहेत, म्हणून शिवार किंवा मतदार संघ पाहून आल्या नाहीत. सरकारचे काम त्यांचे अधिकारी पहात असतात. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान उघड्या डोळ्यांनी दिसत असताना हेतूपुरस्सरपणे मदतीचे ‘स्वार्थी’ राजकारण केले जात असेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करताना सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव केला जात असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे.
शेतकर्यांच्या दुःखाचा राजकारणासाठी वापर होणार असेल तर संवेदनाहिन सरकार व अधिकारी यांच्यामुळे नुकसानभरपाई मिळाली नाही, हे वास्तव आहे. याउलट फक्त आमदार संजय बनसोडे यांना ‘टार्गेट’ करून नुकसान भरपाई मिळाली नाही, म्हणून उर बडवून घेणाऱ्यांना जाहीर झालेल्या नुकसान भरपाईमुळे दिलासा मिळाला असेल, कारण शेतकऱ्याचे नुकसान झाले म्हणून विरोधकांना अन्न पाणी गोड लागत नव्हते.
लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संजय बनसोडे यांनी सरकार व अधिकारी यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्यामुळे आज 61 कोटी 32 लाख रुपये नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे.
विरोध करा, राजकारण करा, पण शेतकर्यांच्या आडून राजकारण करु नका. शेतकरी कोण किती व कशी नाटकं करतोय हे उघड्या डोळ्यांनी पहात आहे. तीन वर्ष सायलेंट मोडवर असणारे एकदम अॅक्टिव्ह मोड मध्ये का आले, हे सगळ्यांना माहित आहे. शेतकर्यांचा, मतदार संघाचा एकदम पुळका का आला याचेही लोकांना कोडे पडतचं नाही.
कारण अनेक वर्षाच्या सहवासाने प्रत्येक नेत्याची कुवत, निवडणुकीतील किंमत व सेटलमेंटसाठीची किंमत कळली आहे. प्रत्येक नेत्याची मत घ्यायची ऐपत मतदारांना पक्की ठावूक आहे. सध्या जे घडले व जे घडत आहे आणि पुढे घडणार आहे, ते फक्त मतदारांच्या हातात व मनात आहे. गोगलगाईच्या पाठीवर बसून राजकारण करणाऱ्यांनी शेतकऱ्याच्या दुखावर बेफिकिरीचे मीठ चोळू नये, एवढेच!