नांदेड : अनैतिक संबंधातून जिल्हा परिषद शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील गारवण जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
अनिल मोहन चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने चिठ्ठीही लिहून ठेवली होती. शाळेतील महिला शिक्षिकेच्या ब्लॅकमेलमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे शिक्षिकेने चिठ्ठीत लिहिले आहे.
मयत अनिल चव्हाण हा हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. 2014 मध्ये शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा सेवेदरम्यान सदरील शिक्षक शाळेतील एका महिला शिक्षिकेच्या संपर्कात आला, हळूहळू त्यांची ओळख वाढली आणि तिच्या प्रेमात पडला.
मात्र, काही वर्षांनी त्यांच्यात काही ना काही कारणावरून वाद होऊ लागले. दरम्यान, त्या सहशिक्षिकेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे शिक्षिकेच्या पत्नीलाही पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती होती.
एकीकडे ब्लॅकमेल सुरू होते तर दुसरीकडे ही बाब घरी कळल्याने शिक्षक मानसिक तणावाखाली होता. ही गुंतागुंत कशी सोडवायची? हे शिक्षकाला समजत नव्हते. अखेर परीक्षेचा पेपर तपासायचा आहे, असे खोटे बोलून शिक्षक बुधवारी रात्री घराबाहेर निघून गेला.
शाळेत पोहोचल्यानंतर शिक्षकाने शाळेच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अनिल चव्हाण यांचा मृतदेह शाळेत आलेल्या नोकराला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची नोंद मनाठा पोलिसांत करण्यात आली.
यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. सहशिक्षका मला वारंवार पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करत आहे. मी या ब्लॅकमेलला कंटाळलो आहे; असे चव्हाण यांनी आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करुण शवविच्छेदनासाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मृत अनिल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, या चिठ्ठीत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.