कोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव जळगाव बातमी ऑनलाइन
चाळीसगाव (प्रतिनिधी)- ज्या जनता जनार्दनाने आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्यासाठीच पुढील आयुष्य खर्ची घालेन असा संकल्प केला होता, दुर्दैवाने ६ महिन्यातच कोरोना जागतिक महामारीचे संकट आले आणि कधी नव्हे असा इतिहासातील पहिला लॉकडाऊन लागल्याने जनजीवन ठप्प झाले. कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चाळीसगाव तालुका असल्याने सर्वात जास्त संसर्गाची चिंता आपल्याला होती.
लॉकडाऊन मुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी वर्गावर उपासमारीची वेळ आली होती, चाळीसगाव तालुक्यातील हजारो नागरीक मुंबई – पुण्यासह इतर राज्यात अडकलेले होते. शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असल्याने त्यांना रोगप्रतिकारक औषधी व फवारणीसाठी योग्य औषधी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. पुढील काळात संसर्ग किती वाढेल ? रुग्ण किती निघतील ? याचा अंदाज बांधून त्यांना परिपूर्ण वैद्यकीय व्यवस्था उभारण्यासाठी निधी अभावी बंद असलेले ग्रामीण रुग्णालयाचे काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणे आवश्यक होते म्हणून मी ठरविले की कोरोना संकट हीच सेवेची संधी आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व माझ्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून २४ तास फिल्डवर काम करण्याचा मी निर्णय घेतला. यामाध्यमातून केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या समोर आहे मात्र फिल्डवर काम करत असताना आज ना उद्या कोरोना आपल्याला गाठणार आहे याची खात्री होती. त्या भीतीने जर मी घरात बसून राहिलो असतो तर आजपर्यंत जे काम कोरोना प्रतिबंधासाठी उभारू शकलो ते झाले नसते. कदाचित जनता जनार्दनाची सेवा केल्याने मिळालेल्या याच आशिर्वादाने मी आज कोरोनावर मात करून पुन्हा त्यांच्या सेवेत येऊ शकलो. सुदैवाने मी खबरदारी घेत असल्याने प्राथमिक लक्षणे आढळताच टेस्ट करून घेतली त्यामुळे कुटुंबासह जनसेवा कार्यालयात कुणालाच संसर्ग झाला नाही मात्र दुर्दैवाने माझ्यासोबत प्रवास केलेल्या माझ्या २ सहकाऱ्यांना त्याचा संसर्ग होऊन त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागला. म्हणून या आजारात खबरदारी हीच मोठी जबाबदारी असून लक्षणे आढळताच योग्य उपचार व कुटुंब व लोकांपासून काही काळ दूर राहिल्यास आपल्यालाही त्रास होत नाही व संसर्गाला देखील वेळीच आळा बसतो असा अनुभव चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जनतेसमोर मांडला.
वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच दि.२२ ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मुंबई येथीलच निवासस्थानी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण हे कोरोनावर मात करून आज दि.९ सप्टेंबर रोजी चाळीसगाव मतदारसंघात परतले. यावेळी पिलखोड, टाकळी प्रदे, आडगाव, देवळी येथील हितचिंतक व कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण करून फुल उधळत स्वागत केले. तर चाळीसगाव येथील मालेगाव नाका येथे नगरसेविका सौ. विजयाताई प्रकाश पवार यांनी देखील त्यांचे औक्षण करत स्वागत केले.
भाजपाच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात झालेल्या स्वागताने भारावले आमदार मंगेशदादा चव्हाण
कोरोना काळात जनतेसाठी आपल्या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी तत्पर असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण हे १७ दिवसांच्या कालावधीनंतर कार्यालयात येत असल्याने तेथे सेवा देणाऱ्या पदाधिकारी व कर्मचारी यांनीदेखील आमदार चव्हाण यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी केक कापून आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला. अनपेक्षितपणे झालेल्या या स्वागताने आमदार मंगेशदादा चव्हाण देखील भारावले.
भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर यांनी स्वागतपर मनोगतात सांगितले कि आमदार मंगेशदादा चव्हाण हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा असून स्वताची काळजी न करता त्यांनी कोरोना काळात जनतेची अविरत सेवा केली. अश्यातच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला मात्र जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने आज ते त्यावर मात करून पुन्हा तालुक्याची सेवा करण्यासाठी आले आहेत. पुढील काळात देखील तालुका वासीयांच्या सेवेत ते अधिक सक्रियपणे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *