सोलापूर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली पाच महिने बंद असलेली मंदिरे सुरू करण्यासाठी काल पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेने मंदिर प्रवेश आंदोलन केले होते. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. हे आंदोलन करण्याबाबतचे निवेदन विश्व वारकरी सेनेने दहा दिवसांपूर्वीच प्रशासनाला दिले होते. ३१ ऑगस्ट रोजी शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन पार पडले.मात्र,आंदोलन झाल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह काही वारकरी तसेच वंचितचे पदाधिकारी आणि आंदोलनामधील सामील कार्यकर्ते, विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, आता बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेच्या वतीने ‘शांततेत पार पडलेल्या आंदोलनाला प्रशासनाने हा गुन्हा दाखल करून गालबोट लावण्याचे काम केले आहे. गुन्हे दाखल झाल्याने विद्यार्थी आणि तरूण वर्गाचे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने आमरण उपोषण केले जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी पुन्हा एकदा प्रशासनाची आणि राज्य सरकारची राहील’,असा इशारा देण्यात आला आहे.