ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है –

बातमी ऑनलाइन विशेष लेख

जग बदल घालूनी घाव सांगुनी गेले मज भीमराव ।।

  आज 1 ऑगस्ट साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा 100 वा  जन्मदिवस. 

 

          अण्णाभाऊ साठे यांनी जे साहित्य निर्माण केले त्यावरून असे दिसून येते कि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्यांच्या साहित्यातून ठळकपणे दिसून येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विसाव्या शतकात विदेशातून उच्च विद्याविभूषित होवून आल्यावर त्यांनी अस्पृश्य समाजाच्या प्रश्‍नाला हात घातला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतात परतले त्यावेळेस महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मातंग कुटूंबात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे व बाबासाहेबांच्या वयातील अंतर 29 वर्षाचे होते.

     अण्णा भाऊ साठे यांचा जन्म करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर.!! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी  शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. दिड दिवस शाळेत जाणार्‍या अण्णाभाऊ साठेंनी तत्कालीन मनुवादी व प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या साहित्यापेक्षाही उच्च दर्जाची साहित्य संपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठेना अवघे 50 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांच्या कारकिर्दीत अण्णांनी 13 लोकनाट्य, 3 नाटके, 13 कथासंग्रह, 35 कांदबर्‍या, 1 शाहीरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवास वर्णन ( माझा रशियाचा प्रवास),  व चित्रपट कथा अशी साहित्यसंपदा  निर्माण केली. अण्णाभाऊ साठे दिड दिवस शाळेत गेले. असतांना शिक्षकांनी त्यांना अपमानित केले हाताची बोटे सुजेपर्यंत मारले. त्यांना मिळालेल्या शिक्षेमुळे दुसर्‍या दिवसापासून अण्णांनी शाळाच सोडून दिली. जेव्हा शाळा आणि परिस्थिती यांना वैतागून वयाच्या 11 व्या वर्षी आई वडिलांसोबत सांगली जिल्हयातील वाटेगाव ते मुंबई हा 227 मैल पायी मजल दरमजल करीत मुंबईला पोहोचले, तेव्हा एका नव्याच जगात आल्याचे भान निश्चितच त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाले असणार. कुटूंब मुंबईत आल्यानंतर भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत रहायला लागले. अण्णाभाऊ साठेनी जवळून गिरणी कामगारांची मुंबई, कष्टकर्‍यांची मुंबई आणि श्रीमंती विलासात वावरणार्‍यांची मुंबई ही त्यांनी इतक्या लहान वयापासून बघायला सुरुवात केली. आपला गाव सोडून अण्णाभाऊ आले होते, पण गावची आठवण मात्र त्यांच्या अंतरात घर करून राहिली होती. म्हणूनच आपल्या अनेक कवितांमध्ये त्यांनी गाव आणि गावातले शिवार यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

     अण्णांनी स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे रशियाचा प्रवास केला. अण्णाभाऊंची साहित्यसंपदा पाहून अण्णांना साहित्य संमेलनासाठी  रशियात बोलावण्यात आले. व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अण्णाभाऊंना दिले. अण्णाभाऊनी साठेनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळख पोवाड्यातून सातासमुद्रपार संपूर्ण जगाला करून दिली. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान देखील झाला. तमाशात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी नाकारून मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी,  

       प्रथम मायभूच्या चरणा,

       छत्रपती शिवबा चरणा,

       स्मरोनी गातो । कवना ॥

 पुष्पमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीची जातीव्यवस्था आणि गावकुसाबाहेरच जग आणि गावकुसाआतल जग ही निर्मिती आहे. पुष्पमित्र शुंगाच्या क्रांतीनंतर मनुस्मृतीचा कायदा लागू करण्यात आला. शुद्रांना शिक्षण बंदी धनसंपत्ती बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी, आणि भेटी बंदी करण्यात आली. ज्या बहुजनांनी मनुस्मृतीचा कायदा झुगारून बाहेर पडले ते गावकुसाबाहेरचे महार, मंाग, चांभार, ढोर म्हणून त्यांची ओळख करण्यात आली आणि ज्यांनी मनुस्मृतीचा कायदा मान्य करून व्यवस्थेशी तडजोड करून जगणे स्विकारले ते ओ.बी.सी. म्हणून प्रचलित झाले. या ओबीसीना व्यवस्थेच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बहुजन संतानी (संत नामदेव, संत तुकाराम महाराज, नरहरी सोनार, संत सावता माळी, संत सेना महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखा, संत कबीर, संत रोहिदास) साहित्य  निर्मिती केली. ती संत काव्य म्हणून आजही ख्यातनाम आहेत.

        गावकुसाबाहेरच्या वंचितांची दुःखे व वेदना मांडणारे साहित्य अण्णाभाऊंनी लिहिले. त्यात अनेक समाजघटक आपल्याला दिसतात. याच समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेब काम करीत होते आणि म्हणूनच त्यांची प्रेरणा ही देखील अण्णाभाऊंच्या अशा साहित्यामागील एक महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. गावातील दलितांना आणि गावकुसाबाहेरील भटक्यांना जी हीन वागणूक दिली, त्याचे अनेक ओरखडे बाबासाहेब आणि अण्णाभाऊंच्या अंतःकरणावर उमटले होते. त्याचेच पडसाद बाबासाहेबांच्या वैचारिक ग्रंथलेखनात आणि अण्णाभाऊंच्या दलित-ललित साहित्यात म्हणूनच खोलवर जाणवत होते. हे दोघेही महामानव त्या काळात मुंबईतच राहायला होते. अर्थात बाबासाहेबांची भ्रमंती महाराष्ट्र आणि देशभर होती, तर अण्णाभाऊंचा जीवनसंघर्ष मुंबईतील परिस्थितीने कोंडून टाकला होता. याही स्थितीत ते लेखन करीत होते, अतिशय दुर्दशेच्या ठिकाणी वास्तव्य करीत होते, तथापि, त्यांच्या अंतःकरणातील समाज प्रबोधनाचा अंगार मात्र तीव्रतेने पेटता राहिला होता.

           श्रेष्ठतेच्या कल्पनेतून धर्मांचे सुकाणु असलेल्यांनी आपल्याच समाज बांधवाना हजारो वर्षे गावाबाहेरच ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली जातात व त्यांना कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत ठेवले. याच समाजव्यवस्थेचा दाहक स्फोट नागेश मंजुळे यांनी आपल्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फँड्री चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सगळ्याच संधी नाकारलेल्या मांतग समाजात अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरश: मिळेल ते काम केले व त्या कामातूनच त्यांना अक्षरओळखही झाली. व त्यातूनच ते कोणत्याही शाळेत न जाता शिकले.  व उत्तम दर्जाची साहित्य निर्मितीही केली.  अण्णांनी स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे रशियाचा प्रवास केला. अण्णाभाऊंची साहित्यसंपदा पाहून अण्णांना साहित्य संमेलनासाठी  रशियात बोलावण्यात आले. व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अण्णाभाऊंना दिले. अण्णाभाऊनी साठेनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळख पोवाड्यातून सातासमुद्रपार संपूर्ण जगाला करून दिली. 

       15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वांतत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट मुंबईतील शिवाजी पार्कवर अण्णाभाऊनी 60 हजार लोकांना घेऊन मोर्चा काढला. या मार्चात मराठीतून नव्हे तर हिंदीतून घोषणा दिली,  यह आझादी झूठी है, देश  की जनता भूखी है । या हिंदी घोषणे वरूनच हे सिध्द होते की, अण्णाभाऊना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील जनतेला हा संदेश दिला होता. यावरून हेही लक्षात येते की,अण्णाभाऊचे हे आंदोलन राष्ट्रव्यापी, देशव्यापी असे होते. या ठिकाणी अण्णाभाऊना फक्त पोटाचीच भूक नव्हे तर बौध्दीक भूख सुध्दा अपेक्षित आहे. उपाशी माणसाला मानसिक स्वातंत्र्याचे महत्व कळत नाही पण जेव्हा त्याच पोट भरत तेव्हा तो मानसिक स्वांतत्र्यासाठी धडपड करतो स्वांतत्र्यानंतरच्या काळात खरे तर  या 6 हजार जातीमध्ये विभागल्या गेलेल्या बहुजन समाजाच्या समस्याचे समाधान व्हायला हवे होते. तसे न होता या समस्या दिवसेंदिवस आणखीनच आ वासत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता तरी या समाज बांधवाना या व्यवस्थेकडून अपेक्षित होत्या. परंतु त्या गरजांना सुध्दा यांना मुकावे लागत आहे.

  शिक्षणासारख्या पवित्र कार्याचे या व्यवस्थेने खाजगीकरण करण्यास सुरूवात केली आहे. खाजगी करणामुळे 6 हजार जातीमध्ये विभागलेल्या समाजातील पालकाना भरमसाठ फी भरून मुलांना शाळेत प्रवेश घ्यावा लागत आहे. त्यात भर म्हणून मुलांना आठवी पर्यंत नापासच करायचे नाही व पुढे 10 वी पर्यंत बेस्ट ऑफ फायू आहेच. म्हणजेच काय तर मुलांच्या मनातील शिक्षणाबद्दलची आत्मीयता व ओढच नष्ट करावयाची नीती या व्यवस्थेने अवलंबली आहे.  म्हणजेच बहुजनाच्या मुलांना डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनियर, कलेक्टर, आयएएस, आयपीएस, आएसआय यासारखे अधिकारी होवूच द्यायचे नाही, यासाठी व्यवस्थेने पुरेपुर तयारीच करून ठेवली आहे. 

भाजपा सरकारने भूमी अधिग्रहण विधेयक मंजूर करण्याच्या विचारात आहेत. यावरून संपूर्ण देशभर अण्णा हजारे व इतर विरोधी पक्ष यांनी जोरदार निदर्शनेही केली. हा जर कायदा भारतात अंमलात आणला गेला तर शेतकर्‍यांच्या जमीनी विना मोबदला मोठमोठ्यां भांडवलदारांच्या घशात जातील. आणि त्यांच्या विरोधात शेतकर्‍यांना कोर्टात दादही मागता येणार नाही अशी व्यवस्था या व्यवस्थेनी केली आहे. म्हणजेच काय तर ज्या शिवाजी महाराजांंनी जमीन कसणार्‍यांना जमीनीचे मूळ मालक केले तेच आता हे सरकार त्याच शेतकर्‍यांना पुन्हा मजूर बनवू पाहत आहेत.

       व्यवस्थेचा आणीख एक नवीन डंख म्हणजे  सेज (Special Economic Zone)  चा  धोरणाचा अवलंब करण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत विदेशातील 27 हजार परदेशी कंपन्या भारतात येऊ घातल्या आहेत. एका कंपनीला कमीत कमी 100  एकर जमीन खरेदी करावी लागणार आहे व त्यानुसार 27 लाख एकर जमीन भांडवलदाराच्या मालकीची होणार. या जमिनीवर मालकी हक्क विदेशी कंपन्याचा. भारताचा तेथे काहीही संबंध राहणार नाही. तेथे आरक्षण लागू होणार नाही. तेथे संविधान लागू होणार नाही. त्यामुळे तेथे बहुजनांना कोठेही स्थान राहणार नाही. शेतात रात्रेंदिवस राबणार्‍या शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन त्यांच्याच जमिनीवर त्यांना वॉचमनची नोकरी मिळेल.   स्वत:ची जमीन तो वॉचमन म्हणून सांभाळणार. कारण आमच्या मुलांची शिक्षणाची आत्मीयता व ओढ अगोदरच नष्ट करून टाकलेली असेल. त्यामुळे शेतकर्‍यांची मुले पुढे शिक्षण घेणारच नाहीत. अशी शिक्षण व्यवस्था निर्माण केली जात आहे. आमची मुले 10 पास व कंपनीत कामगार उच्चशिक्षित इंजिनियर असतील ते शिक्षण आमच्या मुलांकडे असणार नाही म्हणून आमच्या मुलांना तेथे वॉचमन म्हणूनच नोकरी मिळणार. मॉल मध्ये सर्वच प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकावर उपाशी राहण्याची वेळ आणली जात आहे. टपरीवाले, हातगाडीवाले, छोटा व्यवसाय करणारे, रस्त्यावर भाजीपााला विकणारे यांचा व्यवसाय बंद पडणार तर भांडवलदार कोट्यावधी पैसा कमावणार व अधिक श्रीमंत होणार व गरीब अधिकच गरीब होणार अशी ही व्यवस्था.

 अंबानी आपल्या पत्नीला वाढदिवसानिमित्त 35 कोटीचे हेलिकॉप्टर भेट म्हणून देतो. तर दुसरीकडे गरीब आपल्या पत्नीला एकवेळचे जेवण देखील नीट देवू शकत नाही. अंबानीचे घर 4500 कोटी रूपयांचे तर दुसरीकडे गरीबाना रहायला साधे घर सुध्दा नाही. अंबानीचे अँटिलाचे पहिल्या महिन्याचे लाईटबिल 72 लाख रूपये  तर दुसरीकडे आपल्या शेतात जिवाचे रान करून राब-राब राबणार्‍या शेतकर्‍यांच्या  शेतात 12-12 तास लोंडशेंडीग हा कुठला न्याय आहे. याला कारणीभूत आहे ती वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी हे होय.

 स्त्री ही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. जगाची उदारकर्ती, माता, जननी म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते.जगातील प्रगत व  सर्वात जुनी संस्कृतीची जनक निऋती ही होय. ती पण एक स्त्रीच होती. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून स्पर्धा करीत आहे. परंतु आज स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. स्त्रीकडे वाईट नजरेने बघितले जाते. स्त्रीची लोकांच्या मनातील असलेली प्रतिमा ढिसूळ होत चालली आहे. बलात्कारासारखे गुल्हे दिल्ली सारख्या मेट्रो सिटीमध्ये सर्रास घडत आहे. त्यामुळे स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. व स्त्रिया घराबाहेर निघायला सुध्दा दचकतात. याला कारणीभूत आपलीच समाजव्यवस्था ठरत आहे.

ज्या फुले दांपत्यांनी पुणे येथील बुधवार पेठेतून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीबाईंनी अंगावर दगडमाती झेलून, पिचकार्‍या सहन करून मुलींना शिकवले त्याच बुधवार पेठेत आज स्त्रीयांचाच देहाचा व्यापार चालतो. याच्यापेक्षा दुःख ते आणखी काय असणार? त्या स्त्रियांना चूल आणि मूल व्यतिरिक्त समाजात कोणतेही स्थान नव्हते. स्त्रियांना फक्त भोगाची वस्तू समजली जायची. फुले दांपत्यांनी त्यांना या जाचातून मुक्त केले. त्यांना शिक्षण दिले. परंतु त्या शिक्षणाचा उपयोग आज स्त्रिया पोथी पुराण वाचण्यासाठी, संत्सगाला जाण्यासाठी, ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी, साडीचे वेगवेगळे रंग चॉईस करण्यासाठी, वेगवेगळी फॅशन करण्यासाठी करतात. याच्यासाठी का त्यांनी तुम्हाला शिक्षण दिले का आपण  त्यांनी दिलेले शिक्षण हे विसरले आहोत यापेक्षा दुर्देव ते काय असणार ? 

स्त्रियांचे आत्महत्या करण्याचे,  विष  प्राशन करूण मरण्याचे, जळून मरण्याचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या समाजाचे असेल तर ते आहे ओबीसी समाजाचे, एससी समाजाचे. यात ब्राम्हण स्त्रीयां तर नाहीच कारण आम्हाला मूळ शिक्षणाचा अर्थच समजला नाही. त्यांना समजला ते मुले मुली विदेशात शिक्षण घेवून डॉक्टर व इंजिनियर होताहेत व आपले मुले-मुली गुतंलेत पोथी पुराणात. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे म्हणून प्रयत्न केले होते परंतु त्याला सर्वाच जास्त विरोध जर झाला असेल तर तो तत्कालीन ब्राम्हणव्यवस्थेकडून झाला. जर त्याकाळी प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले असते तर आमचे पंजोबाचे पंजोबा शिकले असते. आम्ही अडाणी राहीलो नसतो. आमचे पंजोबाचे पंजोबा आज डॉक्टर, इंजिनियर राहीले असते.

 म्हणून अण्णाभाऊ साठे यांना 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेले स्वातंत्र्य मंजूर नाही. अण्णाभाऊ म्हणतात मिळालेल्या या स्वातंत्र्यातून इंग्रजाच्या पारतंत्र्यातून शेटजी (भांडवलदार) व भटजी मुक्त झाले. बहुजन समाज नाही. जर हे स्वातंत्र्य बहुजन समाजाचे असते तर क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या स्वांतत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले असते. परंतु हे स्वातंत्र्य  खोटे आहे, बहुजनाच्या हिताचे, हक्काचे अधिकाराचे नाही म्हणूनच अण्णाभाऊ साठे या स्वातंत्र्याला यह आझादी झूठी है, देश  की जनता भूखी है। असे म्हणतात.

           असे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 18 जुलै 1969 रोजी अनंतात विलीन झाले.  अशा या लोकशाहीराला कोटी-कोटी प्रणाम.

 जग बदल घालुनी घाव…

जग बदल घालूनी घाव। सांगुनी गेले मज भीमराव ।।

गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।

अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।

धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।

मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।

ठरवून आम्हा हीन अवमानीत। जन्मोजन्मी करुनी अंकित ।।

जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।

एकजुटीच्या या रथावरती। आरूढ होऊनी चलबा पुढती ।।

नव महाराष्ट्रा निर्मुन जगती। करी प्रगट निज नाव।।

 

गीतकार- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेयांच्या कादंबरी वरून निघालेलेचित्रपट-

१ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट   ‘ वैजयंता ‘   साल – १९६१    कंपनी – रेखा फिल्म्स
२ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘टिळा लावते मी रक्ताचा’ साल –१९६९  कंपनी-चित्र ज्योत
३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘डोंगरची मेना’ साल – १९६९  कंपनी – विलास चित्र
४ ‘चिखलातील कमळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘मुरली मल्हारी रायाची’ साल-१९६९ कंपनी -रसिक चित्र
५ ’वारणेचा वाघ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘वारणेचा वाघ’ साल – १९७० कंपनी –  नवदिप चित्र


६ ’ अलगूज’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट  ‘अशी ही सातार्याची तर्हा’ साल –
 १९७४ कंपनी – श्रीपाद चित्र

७ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट   ‘फकिरा’   कंपनी – चित्रनिकेतन

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबऱ्या

 प्रकाशक – 

 १) विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे 

 २) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर-२.  

१  आग
२  आघात
३  अहंकार
४  अग्निदिव्य
५  कुरूप
६  चित्रा
७  फुलपाखरू
८  वारणेच्या खोऱ्यात
९  रत्ना
१०  रानबोका
११  रुपा
१२  संघर्ष
१३  तास
१४  गुलाम
१५  डोळे मोडीत राधा चाले
१६  ठासलेल्या बंदुका
१७  जिवंत काडतूस
१८  चंदन
१९  मूर्ती
२०  मंगला
२१  मथुरा
२२  मास्तर
२३  चिखलातील कमळ
२४  अलगुज
२५  रानगंगा
२६  माकाडीचा माळ
२७  कवड्याचे कणीस
२८  वैयजंता
२९  धुंद रानफुलांचा
३०  आवडी
३१  वारणेचा वाघ
३२   फकिरा
३३  वैर
३४  पाझर
३५  सरसोबत


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित नाटकाची पुस्तके-

प्रकाशक – 

विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे 

 १  बरबाद्या कंजारी २  चिरानगरची
३  निखारा
४  नवती
५  पिसाळलेला माणूस
६  आबी  दुसरी आवृत्ती
७  फरारी
८  भानामती
९  लाडी दुसरी आवृत्ती
१०  कृष्णा काठच्या कथा
११  खुळवाडी
१२  गजाआड पाचवी आवृत्ती
१३  गुऱ्हाळ

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित  वगनाट्ये (तमाश्याची ) पुस्तके

१ अकलेची गोष्ट
२ खापऱ्या चोर
३ कलंत्री
४ बेकायदेशीर
५ शेटजीचं इलेक्शन
६ पुढारी मिळाला
७ माझी मुंबई
८ देशभक्त घोटाळे
९ दुष्काळात तेरावा
१० निवडणुकीतील घोटाळे
११ लोकमंत्र्याचा दौरा
१२ पेंद्याचं लगीन
१३ मूक निवडणूक
१४ बिलंदर बुडवे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित  प्रसिद्ध पोवाडे :

 १ नानकीन नगरापुढे
२ स्टलिनग्राडचा पोवाडा
३ बर्लिनचा पोवाडा
४ बंगालची हाक
५ पंजाब- दिल्लीचा दंगा
६ तेलंगणाचा संग्राम
७ महाराष्ट्राची परंपरा
८ अमरनेरचे अमर हुतात्मे
९ मुंबईचा कामगार
१० काळ्या बाजाराचा पोवाडा

अण्णाभाऊ साठे यांचे प्रवास वर्णन पुस्तक

माझा रशियाचा प्रवास – सुरेश प्रकाशन पुणे

अण्णाभाऊ साठे यांची “फकिरा” कादंबरी :-

लेखन व संपादन : परमेश्‍वर थाटे 

 संदर्भ : –


1) जग बदल घालुनी घाव …
अर्थात
‘अण्णाभाऊजी शाहीरी’ व्यवस्था परिवर्तनाची ललकारी
लेखक – प्रा.गंगाधर गिते
प्रकाशन – मुलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट

 

2) अण्णाभाऊ साठे- लेखक – बजरंग कोरडे ,
साहित्य अकादमी प्रकाशन.अण्णाभाऊ साठे-   लेखक- डॉ. बाबुराव गुरव ,

3) अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या,
माझा भाऊ अण्णाभाऊ- लेखक- शंकर भाऊ साठे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *